ADVERTISEMENT
दिवाळीचे दुसरं नांव दीपावली. हा उत्सव म्हणजे दीपोत्सव. दिव्यांचा उत्सव दिव्यांच्या असंख्य ओळी घराअंगणात लावल्या जातात. म्हणून तिचं नाव दीपावली.
ह्या सणाची सुरवात वसुबारसेपासून योते आणि भाऊबीज साजरी केल्यानंतर दिवाळीची सांगता होते. सर्व अबाल वृद्ध, मुले, स्त्रीया ह्यांचा हा लाडका सण. दिवाळी येणार म्हटलं की आवराआवर रंगरंगोटी. नव्या कपड्यांची, दागिन्यांची, घरातील वस्तूची खरेदीची ही पर्वणी. फटाक्यांची आतिषबाजी अन चविष्ट दिवाळी फराळाचा स्वाद हे ह्या सणाच आणखी एक वैशिष्ट्य.
आपला भारत देश हा कृषीप्रधान देश. आपली थोर संस्कृती सुद्ध सर्वंवर प्रेम करायला शिकवणारी. म्हणूनच की काय वसुबारस ह्या दिवशी आपण गाय आणि वासरू ह्यांची पूजा करतो. त्यांना गोडाचा घास खाऊ घालतो. दुध-दुपत्यासाठी होणारा गायीचा उपयोग शेतीच्या कामी बैलाची होणारी मदत ह्या गोष्टी लक्षांत घेऊन त्या गोधनाची केलेलीही कृतज्ञता पूजा.
धनत्रयोदशीला तिन्ही सांजेला केली जाणारी धनाची पूजा, नैवेद्याला ठेवला जाणारा धने-गुळाचा प्रसाद ह्याला ही फार मोठे महत्त्व आहे. ह्याच दिवशी एक दिवा तयार करून तो यमदेवतेसाठी लावला जातो. दक्षिण दिशा ही यमाची दिशा म्हणून त्या दिवशी त्या दिव्याची ज्योत ही दक्षिणेला केली जाते.
नरक चतुर्दशी हा मुख्य दिवाळीचा पहिला दिवस. ह्या दिवशी पहाटे उठून अभ्यंग स्नान करायचे. नवीन वस्त्रे परिधान करायची. देवदर्शन घ्यायचे आणि सर्वांनी एकत्र जमून दिवाळी फराळ करायचा असा हा आनंद साजरा करण्याचा दिवस. ह्या दिवसाची एक पौराणिक कथा जोडली आहे ती अशी की श्रीकृष्णानी अत्याचारी नरकासुराचा वध करून त्याच्या बंदी शाळेतल्या सोळा सहस्त्र कन्यांची मुक्तता केली. तो हा दिवस, दुष्टाचा नाशा आणि मुक्ताचा आनंद हे या दिवसामागचे आनंद साजरा करण्याचे कारण आहे.
अश्विनातले शेवटचे दोन दिवस आणि कार्तिकाचे पहिले दोन दिवस अशी ही चार दिवसांची मुख्य दिवाळी. अश्विन वद्यअमावस्येला संध्याकाळी घरोघरी, दुकानांतून सोन्या-चांदीच्या पेढ्यातून, ऑफिसातून लक्ष्मीपूजन केले जाते. घरातल सोन नाणं-रोकड ह्यांची पूजा करतात. व्यापारी सर्व हिशेबाच्या वह्यांच पूजन करतो. ह्या धनलक्ष्मीच्या पूजनाबरोबरच त्या दिवशी आरोग्य लक्ष्मी ( केरसुणी ) हिची पण पूजा करतात. लक्ष्मी पूजनानंतर फटाक्यांची अतिषबाजी करून आनंद साजरा केला जातो.
पाडवा म्हणजे बलिप्रतिपदा साडेतीन मुहुर्तातला एक मुहुर्त. ह्या दिवशी अनेक नवे प्रकल्प चालू केले जातात. पाडव्याच्या दिवशी पत्नी पतीला ओवाळते. पती पत्नीला पाडव्याची भेट म्हणून वस्तू, दागिना किंवा साडी भेट देतो. कार्तिक शुद्ध द्वितीयेलाच यमद्वितीया किंवा भाऊबीज असे म्हणतात. बहिण भावाच्या उत्कट प्रेमाचा हा दिवस, बहिण भावाला स्नान घालते, गोड भोजन देते, ओवाळते आणि भाऊ बहिणीला ओवाळणी घालतो.
दिवाळीच्या सणातला लहान मुला मुलींचा आनंदाचा भाग म्हणजे आकाशकंदिल तयार करणे, किल्ला करणे, त्यावर चित्रे मांडणे, संध्याकाळी दारापुढे छान छान रांगोळ्या काढणे आणि फटाके वाजविणे इ. दिपावली हा सण सर्वत्र आनंद व उत्साहाने साजरा होतो. परस्परांना भेट वस्तू, शुभेच्छापत्रे इ. देवून आनंद दिला घेतला जातो. अज्ञानाचा नाश आणि ज्ञानाचा प्रकाश देणारी ही दिवाळी सर्वांनाच प्रिय आहे. जो तो आपापल्या परीने ती साजरी करतो आणि आनंद लुटतो. दिवाळी म्हणजे अत्यंत आनंदी. सुखद दिपावलीच्या अनेक सुखद आठवणींपुढे अनेक दिवस मनांत रेंगाळत राहतात.ADVERTISEMENT