ADVERTISEMENT
आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये अनेक सण उत्साहाने, आनंदाने साजरे केले जातात, त्याच पैकी एक म्हणजे वट पौर्णिमा. ज्येष्ठ महिन्यात येणारी पौर्णिमा ही वट पौर्णिमा म्हणून साजरी केली जाते. ह्या व्रत दरम्यान विवाहित स्त्रिया आपल्या पतीला उत्तम आरोग्य लाभावे, दिर्घआयुष्य प्राप्त व्हावे यासाठी प्रार्थना करतात आणि मनोभावे वडाच्या झाडाची पूजा करतात. वडाच्या वृक्षाचे आयुष्य जास्त असते तसेच त्याच्या पारंब्यांचा विस्तारही खूप मोठा होतो. त्याचप्रमाणे नैसर्गिकतःच दीर्घायुष्य लाभलेल्या वडाच्या वृक्षाप्रमाणे आपल्या पतीला आणि कुटुंबियांना आरोग्यसंपन्न दीर्घायुष्य लाभावे हा त्यामागचा हेतू आहे.
वटपौर्णिमेच्या दिवशी सुवासिनी महिला मराठी पेहराव करतात; नववारी साडी, दागिने यांनी स्वतःला सजवून घेतात. त्यादिवशी सर्व सुवासिनी पारंपरिक वेशभूषा करून पूजेचे ताट हातात घेऊन एकत्र वटवृक्षाची पूजा करण्यासाठी जातात. प्रत्येक गावामध्ये सहसा एक ठरलेले वडाचे झाड असते जिथे ही पूजा होते, शक्यतो गावी मंदिराच्या आवारात किंवा जवळच्या परिसरात वडाचे झाड नक्कीच असते. सौभाग्यच प्रतीक मानले जाणारे हळद-कुंकू आणि काळी पोत, हिरव्या बांगड्या हे सौभाग्य अलंकार तेथे अर्पण करतात. फळांचा राजा आंबा हा तेथे वटवृक्षाची पूजा करताना ठेवतात. ५ फळांचे ५ वाटे बनवतात. ते सुपामध्ये सजवतात आणि सुंदर रुमालाने तो झाकून घेतात. ते वाटे खाण्यासाठी लहान मुले पूजेच्या ठिकाणी आवर्जून गर्दी करतात. तसेच दूध साखरेचा नैवेद्यही दाखवतात. त्यानंतर वडाच्या झाडाला सफेद दोरा गुंडाळून पाच प्रदक्षिणा घालतात, आणि शेवटी त्या धाग्याची वडाच्या खोडाला गाठ मारतात.
या दिवशी सर्व सुवासिनी सावित्री उपवास करून मोठ्या भक्तिभावाने हे सावित्री व्रत पूर्ण करतात. त्या दिवस भर उपवास करतात आणि सूर्यास्तानंतर घरी परत एकदा पूजा करून उपवास सोडतात. या सर्व विधींमुळे घराचे वातावरण प्रसन्न बनते. महाराष्ट्राच्या प्रत्येक भागात वट पौर्णिमे निगडित विविध विधी असतात. जसे कोकणातील काही भागात “सूप वाहने’ असा एक प्रकार असतो. ज्या मध्ये सुवासिनी सूप सजवतात आणि ते परिवारातील वढीलधाऱ्या माणसांना देतात आणि त्यांचा आशीर्वाद घेतात.
वटपौर्णिमा हा सण साजरा करण्यामागे एक कथा आहे. सावित्री हिने आपला पती सत्यवान ह्याचे प्राण यमाकडून कसे परत मिळवले ह्याविषयी ही कथा आहे. अश्वपती नावाचा एक राजा होता. त्याची मुलगी ही सावित्री. सावित्री ही खूप सुंदर, गुणी व नम्र मुलगी होती. सावित्री उपवर झाल्यावर राजाने तिलाच आपला पती निवडण्याची परवानगी दिली. सावित्रीने सत्यवान नावाच्या राजकुमाराची निवड केली. सत्यवान हा एका अंध राजाचा मुलगा होता. शत्रूकडून पराभव झाल्यामुळे राजा आपल्या राणी व मुलासहित जंगलात राहत होता. भगवान नारदांना सत्यवानाचे आयुष्य केवळ एक वर्षाचेच आहे हे माहित असल्यामुळे त्यांनी त्याच्याशी लग्न करू नकोस असा सल्ला सावित्रीला दिला. पण सावित्रीने ते मान्य केले नाही तिने या अल्पायुषी सत्यवानाशी लग्न केले. त्यानंतर सत्यवान आणि त्याच्या आई व वडिलांसोबत ती जंगलात राहू लागली आणि त्यांची सेवा करू लागली. असाच त्यांचा संसार सुखाने चालू होता. बघता बघता एक वर्ष पूर्ण होत आले. सत्यवानाचा मृत्यू जेव्हा होणार होता त्याआधी तीन दिवस तिने उपवास करून सावित्री व्रत केले.
सत्यवान जंगलात लाकडे तोडण्यास निघाला त्यावेळी सावित्री सुद्धा त्याच्यासोबत जंगलात निघाली. सत्यवान लाकडे तोडत होता आणि सावित्री ती लाकडे गोळा करत होती. लाकडे तोडता तोडता अचानक त्याला चक्कर आणि तो जमिनीवर पडला. त्यावेळी यमराज तेथे आले आणि सत्यवानाचे प्राण नेऊ लागले. सावित्री यमराज्यांच्या मागे आपल्या पतीबरोबर जाऊ लागली. यमाने अनेक वेळा सावित्रीला परत जाण्यास सांगितले. पण सावित्रीने साफ नकार दिला आणि आपल्या पतीबरोबर जाण्याचा हट्ट धरला. अखेर यमाने कंटाळून पती सोडून तिला तीन वर मागण्यास सांगितले. सावित्रीने सासू सासऱ्यांचे डोळे आणि त्यांचे राज्य परत मिळावे असा वर मागितला आणि आपल्याला पुत्र व्हावा असा वर मागितला. यमराजाने गफलतीने तथास्तु म्हटले तेव्हा त्याला वचनबद्ध झाल्याची आठवण झाली आणि सत्यवानाचे प्राण परत करावे लागले. सत्यवानाचे प्राण सावित्रीने वडाच्या झाडाखाली परत मिळवले म्हणून सुवासिनी वटवृक्षाची पूजा करून हे व्रत पूर्ण करतात.
आज काल मात्र नवीन पिढी हे सर्व सण, त्यांचे महत्व विसरत चालली आहे. आपण आता विज्ञानाची कास धरत आहोत, आणि आपल्या हजारो वर्षांपासून चालत आलेल्या सणांना, रूढींना आपण अंधश्रद्धा मानतो. विज्ञान ही गरजेचे आहे, तसेच आध्यात्म ही जरूरी आहे, आपण दोन्ही गोष्टी समजून घेण्याची गरज आहे. पुरातन काळाचे शास्त्र ही खूप प्रगल्भ आहे, ते समजून घेणे गरजेचे आहे.आपले सण, व्रत, पूजा, विधी यांना कारणे आणि इतिहास आहे, त्या डोळे बंद करून उडवून देण्यापेक्षा आपण त्या समजण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
ADVERTISEMENT