ADVERTISEMENT
वैशाख महिना हा मराठी महिन्यांतील दुसरा महिना. या वेळी सूर्याची प्रखरता तीव्रतेने जाणवते. त्याचा परिणाम सभोवतालच्या सृष्टीवर पडलेला दुसतो, म्हणून या महिन्याला वैशाख वानवा असंही म्हणतात. त्यामुळे थंड पाणी पिणे, थंड पाण्याने अंघोळ करणे आल्हाददायक वाटते.
या महिन्यात महत्वाचे सण व उत्सव येतात. त्यात अक्षय तृतीया हा मोठा सण येतो. तो साडेतीन मुहूर्तांपैकी एक आहे. अक्षय म्हणजे जे सतत राहते ते. म्हणून या तृतीयेला जे कराल ते अक्षय होते अशी आपली धारणा आहे. त्यामुळे या दिवशी जप, होम, दान केले जाते. हि तृतीया बुधवारी आली व त्याच दिवशी रोहिणी नक्षत्र असेल तर ती अक्षयतृतीया महापुण्यकारक समजली जाते. याची माहिती सांगणारी एक कथा फारच बोलकी आहे, ती अशी - शाकल नगरात धर्म नावाचा वाणी राहत होता. तो इतरांसारखा नव्हता, तर तो सत्यवचनी होता. देव-ब्राह्मणांची तो पूजा करित असे. एक्दाब्राह्मणानें त्याला अक्षयतृतीयेचे माहात्म्य सांगितले. त्याला ते पटले. ब्राह्मणाने सांगितल्याप्रमाणे त्याने नदीवर जाऊन, स्नान करून पितरांना तिळतपर्ण करून ब्राह्मणांना दक्षिणा दिली. अशा प्रकारे प्रतिवर्षी हा उपक्रम त्याने नित्यनेमाने चालूच ठेवला. कोणत्याही विघ्नाची पर्वा केली नाही, असा हा धर्म नावाप्रमाणे धर्मासारखा जगला. त्याचे भाग्य थोर म्हणून परमेश्वराचे स्मरण करत असताना त्याला मृत्यू आला. पुढील जन्मी त्याला गतजन्माची पूण्याई कमला आली आणि त्या पुण्याईवर त्याला राज्यपद मिळाले. राज्यपद मिळाल्यावर गर्व ना करता त्याने पूर्वीप्रमाणेच दानधर्म चालू ठेवला. परंतु त्याचा खजिना कधीच रिकामा झाला नाही, याचे कारण त्याने अक्षयतृतीयेला भरपूर दान धर्म केला होता.
हा सण विष्णुप्रित्यर्थ आहे. वसंतमाधवाची पूजा व तृषितांसाठी उदककुंभ दान केले जातात. या महिन्यातील व्रत-वैकल्यें या महिन्याच्या हवामानाला अनुसरुनच केलेली आहेत. या महिन्यात सर्व वातावरण तापलेले असते. त्यामुळे या महिन्यात गरिबांना कुंभदान, सार्वजनिक पाणपोई सुरु करणे, गरजूंना पंखा, छत्री, चंदने यांचे दान करावे, असे म्हटले आहे. वसंतोत्सव साजरा करून स्त्रिया कैरीचे थंड पन्हे देतात. तर मृत पितरांसाठी श्राद्ध अपिंडक किंवा तीळ-तपर्ण केले जाते. आपले पूर्वज पाणी पिण्यास येतात अशी कल्पना आहे.
या मुहूर्तावर शेतकरी कामास सुरुवात करतो. विशेषतः देशावर हा सण मोठ्या उत्साहाने पार पडला जातो.
ADVERTISEMENT